जळगाव जामोद शहरात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची समाजकंटकांनी विटंबना करण्याचा केलेला प्रयत्न हा केवळ एक गुन्हा नसून, तो संविधान, समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांवर केलेला थेट हल्ला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे.
बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्मारकाची विटंबना म्हणजे कोट्यवधी आंबेडकरी विचार मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावण्याचा कुटील डाव आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तींचा समाजवादी पार्टी तीव्र शब्दांत निषेध करते.
सदर प्रकरणी संबंधित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मात्र केवळ कारवाई पुरेशी नाही — अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढू नयेत यासाठी कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे.
समाजात शांतता बिघडवणाऱ्या, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या आणि संविधानिक मूल्यांना तिलांजली देणाऱ्या प्रत्येक शक्तीविरोधात समाजवादी पार्टी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. बाबासाहेबांचा विचार अमर आहे, तो कोणीही विटंबना करून संपवू शकत नाही — उलट अशा घटनांमुळे आंबेडकरी विचार अधिक मजबूत होतो, हे समाजकंटकांनी लक्षात ठेवावे.
प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कोणतीही माफी न देता कठोर कारवाई करावी, हीच आमची ठाम भूमिका आहे.
जय भीम!
संविधान जिंदाबाद!
आपलाच,
युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण
समाजवादी पार्टी
Tags
जळगाव जामोद