नांदुरा (बुलढाणा):
भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार व पदाधिकारी वारंवार मुस्लिम समाज आणि मुस्लिम सुफी संतांविरोधात अपमानजनक वक्तव्ये करत असतानाही, नांदुरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिम समाजाने लोकशाहीची परिपक्वता दाखवत भाजपाला भरघोस मतदान केले. या एका हाताच्या सहकार्यामुळेच भाजपाची नांदुरा नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.
मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजपाच्या नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम समाजाला दिलेल्या विश्वासाचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद खा. युनुस खा. पठाण यांनी केला आहे.
गैबी नगरसह नांदुरा शहरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये आजही पिण्याच्या गोड पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना दिवसेंदिवस पाण्यासाठी भटकावे लागत आहे. स्वच्छता, नाल्या, रस्ते, कचरा उचलणे यासारख्या मूलभूत सुविधांकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विशेष म्हणजे गरीब व मध्यमवर्गीय मुस्लिम नागरिकांवर वाढीव कराचा बोजा टाकण्यात येत असून, हा अन्यायकारक कर तात्काळ कमी करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या मुस्लिम नागरिकांना काही अधिकाऱ्यांकडून समान वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. “नगरपरिषद ही कोणत्याही एका धर्माची मालमत्ता नाही, ती सर्व नागरिकांची आहे,” असा खडा सवाल आझाद पठाण यांनी उपस्थित केला.
“मुस्लिम समाजाने मतदान केले म्हणून सत्ता मिळाली, पण सत्ता मिळाल्यानंतर मुस्लिम वस्त्यांकडे पाठ फिरवली जात असेल, तर हा लोकशाहीचा अपमान आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
भाजपाच्या नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून मुस्लिम वस्त्यांमध्ये तात्काळ गोड पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, वाढीव कर कमी करावा आणि नगरपरिषद प्रशासनाला सर्व समाजाशी समान वागणुकीचे स्पष्ट आदेश द्यावेत, अन्यथा समाजवादी पार्टी व मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Tags
नांदुरा