बुलढाणा | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी प्रक्रियेला बुलढाणा जिल्ह्यात वेग आला आहे. ही प्रक्रिया 10 डिसेंबर 2025 पासून सुरू असून, शेतकऱ्यांनी 24 जानेवारी 2026 पर्यंत आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 89,340.75 हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण झाली असून, एकूण 7,99,195 पीक पाहणीयोग्य प्लॉटपैकी 80,028 प्लॉट्सची नोंदणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ई-पीक पाहणीची प्रगती 39.32 टक्के इतकी आहे.
ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या अँड्रॉईड मोबाईल फोनद्वारे ‘ई-पीक पाहणी DCS व्हर्जन 4.0.5’ अॅप वापरून 7/12 उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, ते अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही किंवा अॅप वापरण्यात अडचण येत असेल, त्यांनी संबंधित गावातील तलाठी, कोतवाल, नियुक्त DCS सहाय्यक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) यांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ई-पीक पाहणीची नोंदणी न केल्यास 7/12 उताऱ्यावर पीक कोरे राहील, त्यामुळे पुढे पीक विमा, शासकीय अनुदान व नैसर्गिक आपत्ती मदत मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
ही माहिती जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), बुलढाणा यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.