🗓 दि. 19 जुलै 2025
📍 नांदुरा – फणसे ले-आऊ
नांदुरा शहरातील फणसे लेआऊट भागात राहणाऱ्या आणि रस्त्यावर भेळ व पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रविंद्र द्वारकादास शर्मा यांचा मुलगा जितेंद्र शर्मा याने सीए परीक्षेत यश मिळवत नांदुरा शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.
सीए सारखी अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण होणं हे कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी मोठं स्वप्न असतं. पण जेव्हा एक गोरगरिब, सामान्य परिस्थितीत वाढलेला तरुण अत्यंत प्रतिकूल स्थितीतून अभ्यास करतो, मेहनतीच्या जोरावर उभा राहतो आणि अखेर या देशातील सर्वोच्च दर्जाची पदवी मिळवतो, तेव्हा त्याचं कौतुक करणं हे समाजाचं कर्तव्य ठरतं.
याच भावनेतून मित्र फाऊंडेशन, नांदुरा यांच्या वतीने आज जितेंद्र शर्मा यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
त्यांच्यासह त्यांचे वडील श्री. रवि शर्मा आणि बंधू मनोज शर्मा यांचा देखील शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी जितेंद्र शर्माने आपल्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी उलगडली –
“घरात पुरेसे पैसे नव्हते, वीज सुद्धा बऱ्याच वेळा नसायची, पण मी ठरवलं होतं… परिस्थितीवर नाही तर स्वप्नांवर विश्वास ठेवायचा!”
त्याच्या या बोलण्याने उपस्थित सर्वांची मने भारावून गेली.
मित्र फाऊंडेशन नांदुरा च्या सर्व सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार झाले. अशा युवकांमुळे नव्या पिढीला खऱ्या अर्थाने दिशा मिळते आणि समाजात परिवर्तन घडते.
जितेंद्र शर्माचा हा प्रवास म्हणजे केवळ एक यशकथा नाही, तर ती संघर्ष, समर्पण आणि स्वप्नपूर्तीची जीवंत साक्ष आहे.
✍🏻 — मित्र फाऊंडेशन, नांदुरा
Tags
नांदुरा