:
बुलडाणा – जिल्हा रुग्णालयात शासनाच्या निधीतून आणलेली अत्याधुनिक एमआरआय मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून निष्क्रिय अवस्थेत पडून असून, ही सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जनसामान्य नागरिक वाट पाहत असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण खाजगी रुग्णालयांत महागड्या दराने एमआरआय चाचणी करून घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.
अॅड. वसीम कुरेशी यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सदर एमआरआय सुविधा तातडीने सुरु करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. “शासनाने जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी आणि आरोग्यसेवांच्या मजबुतीसाठी ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यंत्रणा असूनही ती सुरु न करणे ही जनतेच्या हक्कांची पायमल्ली आहे,” असे अॅड. कुरेशी यांनी स्पष्टपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “या सुविधेच्या अभावामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दरवेळी औरंगाबाद, अकोला किंवा अमरावती येथे जावे लागत आहे. खाजगी संस्थांमध्ये ५ हजार ते ८ हजार रुपये पर्यंत खर्च करून चाचण्या कराव्या लागतात. शासनाच्या यंत्रणेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांसाठी ही स्थिती अत्यंत अन्यायकारक आहे.”
जर लवकरात लवकर एमआरआय सेवा सुरु करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अॅड. कुरेशी यांनी यावेळी दिला.
शासन व प्रशासन यांच्याकडे मागणी:
एमआरआय सेवा सुरु करण्यासाठी तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून, आवश्यक मनुष्यबळ व तज्ज्ञ नेमावे, अशी मागणी ही जनतेच्या वतीने करण्यात आली आहे. या सुविधेच्या सुरूवातीमुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल आणि सामान्य रुग्णांचा आर्थिक भारही कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
मोताळा