नांदुरा रेस्ट हाऊसमधील वाढदिवसाच्या पार्टीत वाद; भाजप व मित्र पक्षाच्या नगरसेवकांत संताप, मारहाणीचीही चर्चा


नांदुरा (दि. 9 मार्च 2026) :
नांदुरा शहरातील रेस्ट हाऊस येथे एका नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या नगरसेवकांसाठी जेवणाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप व मित्र पक्षाच्या नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा नगरपरिषदचे उपाध्यक्ष पती प्रमोद खोड हे रात्री रेस्ट हाऊस येथे आले. त्यावेळी त्यांनी उपस्थित नगरसेवकांना “मला या पार्टीसाठी फोन का केला नाही?” असा प्रश्न विचारला. त्यावर संबंधित नगरसेवकांनी “आपल्याला फोन केला होता” असे सांगितल्याचे समजते.
यानंतर वातावरण अचानक तापले. चर्चेनुसार, प्रमोद खोड यांनी संतापाच्या भरात काही आक्षेपार्ह व असभ्य शब्दांचा वापर केल्याची चर्चा नांदुरा शहरात सुरू आहे. या वक्तव्यामुळे उपस्थित भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व संताप निर्माण झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नगरसेवक ठाकुर, नगरसेवक जुबेर खान तसेच इतर नगरसेवकांनी या वक्तव्याला कडाडून विरोध करत प्रमोद खोड यांना चांगलेच सुनावल्याची माहिती समोर येत आहे. काही काळ रेस्ट हाऊस परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या वादाच्या दरम्यान काही नगरसेवकांनी प्रमोद खोड यांना धक्काबुक्की अथवा मारहाण केल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. मात्र या घटनेबाबत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
या घटनेनंतर नांदुरा शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी संयम आणि सभ्य भाषा वापरावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच या प्रकारामुळे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या नगरसेवकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने