नांदुरा (ता. १६ जून): गैबी नगर, नांदुरा परिसरात लावलेली हाय मास्ट लाईट्स गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने कार्यरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. दिवसा सकाळपासून दुपारपर्यंत या लाईट्स चालू असतात, तर रात्रीच्या आवश्यक वेळेत त्या बंद राहत असल्यामुळे अपघात, चोरी, आणि अन्य अनुचित प्रकारांच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद खा पठाण यांनी आज नगरपरिषद नांदुरा येथे निवेदन दिले. त्यांनी मुख्याधिकारी यांना विनंती केली की, लाईट्सचे वेळापत्रक आणि नियंत्रण प्रणाली तातडीने तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, जेणेकरून रात्रीच्या वेळेस परिसर प्रकाशमय राहील आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळेल.
"गैबी नगरमधील नागरिक वारंवार ही समस्या अनुभवत आहेत. दिवसा वीजेचा अपव्यय होत आहे आणि रात्रीच्या वेळेस अंधारामुळे असुरक्षितता निर्माण होते. ही बाब गांभीर्याने घेतली जावी, अशी आमची अपेक्षा आहे," असे पठाण यांनी सांगितले.
निवेदनाद्वारे प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असून, जर लवकर उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Tags
नांदुरा