नांदुरा येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्न


📍 नांदुरा | प्रतिनिधी
नगरपरिषद नांदुरा शहर हद्दीतील नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी तात्काळ व प्रभावीपणे सोडविण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” गुरुवारी (दि. ०८ मे २०२६)
 नगरपरिषद टाऊन हॉल, नांदुरा येथे उत्साहात पार पडले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार श्री चैनसुखजी संचेती हे उपस्थित होते. तसेच बुलढाणा नगराध्यक्षा मा. मंगलाताई मुऱ्हेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नगर परिषदेचे गटनेते, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. प्रभारी तहसीलदार श्री एस. एस. व्हट्टे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली.
यावेळी बोलताना आमदार चैनसुखजी संचेती यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश दिले. तसेच ०१ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे नियमानुसार करण्याबाबत मार्गदर्शन केले. नगरपालिका हद्दीतील रमाई योजना व इतर शासकीय आवास योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
शिबिरामध्ये महिला बचत गटांना धनादेश वितरण करण्यात आले. तसेच पीएम योजनांचे लाभही नागरिकांना देण्यात आले. याशिवाय फेरफार, सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, शिधापत्रिका, पीएमएवाय घरकुल योजना, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आदी विविध सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याधिकारी श्री देशमुख यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

إرسال تعليق

أحدث أقدم