मुंबई : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 26 जुलै 2026 रोजी शहीद स्मारक, बीएमसी ऑफिस समोर, मुंबई येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात नायक रतन मधुकर डोंगरदिवे (निवृत्त) यांना प्रतिष्ठेचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय सैन्य सेवेला गौरव देण्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
रतन मधुकर डोंगरदिवे यांनी भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर सैन्य प्रशिक्षण केंद्रामध्ये कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी देशातील विविध संवेदनशील आणि दुर्गम भागात उल्लेखनीय सेवा बजावली. अहमदाबाद, सुजानपूर (पंजाब) येथे राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत राहून त्यांनी देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. श्रीनगर कॅन्ट येथे पोस्टिंगदरम्यान त्यांनी अत्यंत जबाबदारीने कर्तव्य पार पाडले.
पुणे येथे PT स्टाफ म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. तसेच विविध ग्रुप पोस्टिंगमध्ये जबाबदारी सांभाळत त्यांनी सैन्य दलात शिस्त, समर्पण आणि नेतृत्वाचे उदाहरण निर्माण केले. 2017 मध्ये लेहसारख्या अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी देशसेवा बजावली. त्यानंतर चंदीगड तसेच मिसमारी, आसाम येथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
दिनांक 31 जुलै 2020 रोजी भारतीय सैन्यातून सन्मानपूर्वक निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. देशसेवेतील त्यांचे समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि दुर्गम भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “सैनिक रत्न पुरस्कार” देण्यात येत असल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
🇮🇳 जय हिंद !