सोशल मीडियावरील बदनामीकारक प्रचाराविरोधात समाजवादी पार्टी आक्रमक

जळगाव जामोद :
युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी सोशल मीडियावर चालविण्यात येत असलेल्या खोट्या व बदनामीकारक प्रचाराविरोधात दिनांक 26 ऑगस्ट रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, सदर तक्रारीवर संज्ञेय गुन्हा असूनही अद्याप FIR दाखल न झाल्यामुळे समाजवादी पार्टी आक्रमक झाली आहे.

जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस सय्यद शफीक यांनी मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना निवेदन सादर करून तक्रारीवर त्वरित FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, काही युट्यूब चॅनेल्सद्वारे आझाद पठाण यांचे व समाजवादी पक्षाचे नाव गैरप्रकारे वापरून खोटी व वैमनस्य निर्माण करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. हा प्रकार कायद्याच्या विरोधात असून समाजात तणाव निर्माण करणारा आहे.

निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, संज्ञेय गुन्हा असूनही FIR दाखल न करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या "ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार (2013)" या निकालातील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने तातडीने FIR दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावरील खोटी माहिती हटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

📌 समाजवादी पार्टीने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने FIR दाखल करून योग्य कारवाई केली नाही, तर बुलढाणा जिल्हा समाजवादी पार्टी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल. याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने