पट्टा धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्या... – अ‍ॅड. वसीम कुरेशी यांची प्रशासनाकडे तात्काळ मागणी



धामणगाव बढे, ता. मोताळा (जि. बुलडाणा) – मोताळा तालुक्यातील ज्या नागरिकांना शासकीय जमीन पट्टे मंजूर झाले आहेत आणि त्यांची नावे घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत, अशा सर्व पात्र नागरिकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. वसीम कुरेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आज दिनांक 19 जुलै 2025 रोजी, सदरचे महत्त्वाचे व अती तात्काळ स्वरूपाचे निवेदन त्यांनी तहसीलदार मोताळा, गटविकास अधिकारी मोताळा व ग्रामपंचायत अधिकारी धामणगाव बढे यांना व्हॉट्सॲपद्वारे अधिकृतपणे पाठविले आहे.
अ‍ॅड. कुरेशी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “अनेक लाभार्थ्यांना शासकीय जमीन पट्टा मिळालेला असूनही, घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या नावांचा समावेश अधिकृत लाभार्थी यादीत असूनही निधी वितरित करण्यात आलेला नाही. हे अन्यायकारक असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी.”
“कोणालाही वंचित ठेवू नये, आणि पात्रतेनुसार सर्वांना हक्काचा लाभ मिळावा, यासाठी मी हा पाठपुरावा करत आहे. गरजूंना निवारा मिळणे ही प्राथमिक गरज आहे,” असेही कुरेशी यांनी स्पष्ट केले.
या मागणीला गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांतूनही पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने