महावितरणच्या फसव्या मीटरमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का!वाढलेल्या वीज बिलाच्या विरोधात आझाद पठाण यांच्या नेतृत्वात नांदुरा वासीयांचे आंदोलन





खामगाव / नांदुरा – पोलिस वसाहतीतील इमारत क्रमांक ३ मध्ये महावितरणने बसवलेले नविन जीएसएम मीटर हे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जुन्या मीटरच्या तुलनेत नव्या मीटरमुळे वीज बिलात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. ही लूट थांबवावी म्हणून संतप्त पोलिस कर्मचाऱ्यांनी १ जुलै रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंता, खामगाव यांना निवेदन दिले.

सदर मीटरमध्ये तांत्रिक बिघाड असून, हेतुपुरस्सर अधिक वीज बिल आकारले जात असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. नव्या मीटरमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जुन्या मीटरची व्यवस्था पुन्हा लागू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्ज इशाराही त्यांनी दिला.

या अन्यायकारक आणि शासकीय अनास्थेविरोधात नांदुरा शहरातील नागरिकही आक्रमक झाले असून, समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा वासीयांनी आवाज उठवला आहे. महावितरणच्या फसव्या यंत्रणेविरोधात नांदुरा येथे निवेदन व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक रहिवासी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आझाद पठाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
"महावितरणने जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम थांबवावे. नवीन मीटरमुळे कोणतीही पारदर्शकता नाही. हे मीटर तात्काळ काढून टाकण्यात यावे. अन्यथा समाजवादी पार्टी नांदुरा शहरात उग्र आंदोलन करेल आणि याचे पूर्ण जबाबदार महावितरणचे अधिकारी असतील."

महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता ही लढाई नांदुरा वासीयांची बनली आहे. लवकरच याबाबत सविस्तर चौकशी न केल्यास, जिल्हा पातळीवर आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने