नांदुरा, ता. २३ जून २०२५ – नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये राहणाऱ्या श्रीमती संध्या शरद राठोड या विधवा महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर तब्बल ३० वर्षांपासून अंत्योदय निराधार योजना चालू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सतत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.
या प्रकरणी तिने थेट तहसील कार्यालयात तक्रार अर्ज सादर केला असून, या प्रक्रियेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नांदुरा शहर अध्यक्ष अनिल भाऊ जांगडे यांनी पुढाकार घेत, विधवा महिलेला आवश्यक ती मदत केली. तिला योग्य मार्गदर्शन देऊन नायब तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत, तिच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
श्रीमती राठोड यांना नायब तहसीलदारांच्या नावाने काही दलालांनी भरघोस पैसे मागितल्याचा आरोप असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तिने आपल्या अर्जात स्पष्ट नमूद केले आहे की, नारखेड़े मेढम यांच्याशी संबंधित व्यक्तींनी तिच्याकडून १५०० रुपये घेतले आणि वारंवार पैसे मागून त्रास दिला. इतकंच नव्हे, तर तिच्या आरोग्याच्या गंभीर परिस्थितीबाबत सांगूनही तिला वेळेवर शासकीय मदत मिळाली नाही.
या सर्व प्रकारात, अनिल भाऊ जांगडे यांनी श्रीमती राठोड यांच्या मदतीसाठी उभं राहत संपूर्ण प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने तातडीने कारवाईस सुरुवात केली आहे.
श्रीमती संध्या राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित असून, दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. अनिल भाऊ जांगडे यांचे या सामाजिक कार्यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
नांदुरा