पोलीस चौकी नंबर १ समोरील नाली व ढाप्याची गंभीर समस्या — नगरपरिषद मलकापूर यांना आठ दिवसांचे अल्टिमेटम



मलकापूर शहरातील पोलीस चौकी नंबर १ समोर असलेल्या छोट्या दरवाज्याच्या आतील नाली व ढापे जाम झाल्यामुळे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही नाली आठ ते दहा वेळा साफ केली असली तरी ढाप्याखाली अडकलेली घाण काढता आली नाही. त्यामुळे सांडपाणी अजूनही उघड्यावर वाहत असून, परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे.

या परिस्थितीमुळे दुर्गा नगर, छोटा बाजार, नस्वाला चौक येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर तसेच सार्वजनिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

सदरील समस्या केवळ तात्पुरत्या उपायांनी सुटणार नसून, जुने ढापे तोडून नवीन नाली व ढापे बांधणे हाच कायमस्वरूपी उपाय आहे. मात्र, प्रशासन केवळ सफाई कामगारांद्वारे तात्पुरती साफसफाई करून जबाबदारी झटकत आहे, जे अजिबात स्वीकारार्ह नाही.

या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. राजू पाटील यांनी नगरपरिषद मलकापूर यांना आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले असून, या कालावधीत जर काम सुरु झाले नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर असेल, याची नोंद घ्यावी.

— राजू पाटील
शहराध्यक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मलकापूर
जिल्हा बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने