नांदुरा, दि. 08 जून 2026 : नांदुरा तालुक्यात अवैध रेती उत्खनन, वाहतूक व साठवणुकीचा काळाबाजार खुलेआम सुरू असून प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सविस्तर निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
आझाद पठाण यांनी आरोप केला की, नांदुरा तालुक्यातील विविध नदीपात्रांमधून दिवस-रात्र रेतीचा उपसा सुरू असून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. अनेक वेळा तक्रारी, स्मरणपत्रे आणि आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले असून कायद्याची भीती पूर्णपणे संपली आहे.
विशेष म्हणजे, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणारे तत्कालीन तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर तहसील कार्यालयातच हल्ला झाल्याची घटना घडूनही प्रशासनाने या माफियांवर वचक निर्माण करण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
"दफडे वाजवूनही तहसीलदार नांदुरा गाढ झोपेत आहेत का?" असा संतप्त सवाल उपस्थित करत आझाद पठाण यांनी अवैध रेती माफियांना अभय देणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. तसेच अवैध रेती व्यवसायाविरोधात आवाज उठवल्यामुळे स्वतःला धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात सर्व रेती घाटांची संयुक्त तपासणी, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, वाहने व यंत्रसामग्री जप्त करणे, विशेष धाडसत्र राबविणे, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करणे तसेच आझाद पठाण यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई न केल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.