जळगाव जामोदमध्ये पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार; बदलीचीही मागणी, समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बुलढाणा : जळगाव जामोद येथील स्थानिक गुप्तवार्ता शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषद जळगाव जामोदचे नगरसेवक सय्यद नफीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे स्थानिक राजकीय व्यक्तींशी निकट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही नागरिकांनी राजकीय विरोधक, अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती तसेच दलित बांधवांना विनाकारण चौकशी व दबावाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. सय्यद नफीस यांनी संबंधित कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद येथे कार्यरत असल्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्यकाळाची, संवेदनशील प्रकरणांतील सहभागाची तसेच अधिकृत कामकाजाची दखल घेण्याची मागणी केली आहे. स्थानिक राजकीय किंवा प्रशासकीय प्रभाव राहू नये, यासाठी वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची दखल घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची बुलढाणा जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या मागण्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास समाजवादी पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم