राजुरा प्रकरण : कारवाई फक्त कनिष्ठांवरच का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी कुणी ठरवणार?

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील कथित मृतदेह प्रकरणाने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ज्या महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली, तीच महिला जिवंत अवस्थेत समोर आल्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी नागरिकांचा संतप्त सवाल आहे की, तपासाचे पर्यवेक्षण करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत होते? तपासातील इतकी मोठी चूक घडत असताना वरिष्ठांची भूमिका तपासली जाणार की नाही?
स्थानिक पातळीवर चर्चा अशी आहे की, यशस्वी कारवाईचे श्रेय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुढे येतात; मात्र तपास फसला किंवा गंभीर चुका उघड झाल्या तर जबाबदारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ढकलली जाते. त्यामुळे या प्रकरणात केवळ काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदारी झाकण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निर्दोष व्यक्तींना अटक झाली असेल तर त्यासाठी जबाबदार कोण? पुराव्यांची पडताळणी कोणी केली? मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली? आणि त्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणारे अधिकारी कुठे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत.
राजुरा प्रकरण हे केवळ तपासातील चूक नसून पोलिस प्रशासनातील उत्तरदायित्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून कनिष्ठांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
"चुका कनिष्ठांच्या आणि श्रेय वरिष्ठांचे" ही व्यवस्था बदलणार का? हा प्रश्न आता बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने